बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन त्यांच्या कुटुंबामुळे सुद्धा अनेकदा चर्चेत राहतात. त्यांच्या कुटुंबाला लोक आदर्श मानतात. खास करुन अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा लाइम लाइटपासून दूर राहून सुद्धा अनेकदा चर्चेत असते. आज श्वेता बच्चनचा ४७ वा वाढदिवस.
संपूर्ण कुटुंब अभिनय क्षेत्रात असताना श्वेतानं मात्र फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम सुरू केलं. श्वेतानं असं करण्यामागचं कारण एकदा तिच्या कॉलममधून सांगितलं होतं. तिच्यासोबत चित्रपटाच्या सेटवर असं काही घडलं की तिनं अभिनय क्षेत्रात कधीच पाऊल न टाकण्याचा निर्णय घेतला.श्वेता बच्चन नंदा हिचा जन्म भारतात झाला होता.
पण ती उच्च शिक्षणासाठी स्वित्झर्लंड येथे गेली. काही वर्ष तिथे घालवल्यानंतर ती पुन्हा भारतात परतली आणि तिनं या ठिकाणी पत्रकार म्हणून काम करायला सुरुवात केली. ती एका न्यूज चॅनेलसाठी काम करत होती. तिला पहिल्यापासूनच लाइमलाइट पासून दूर राहाणं पसंत होतं. त्यामुळेच तिनं बॉलिवूड पासून दूर राहणंच पसंत केलं.
पण तिला फॅशनची विशेष आवड होती त्यामुळे तिनं २००६ पासून मॉडेलिंगला सुरुवात केली.श्वेता एक उत्तम लेखिका सुद्धा आहे. एका कॉलममध्ये तिनं आपण बॉलिवूड किंवा अभिनय क्षेत्रापासून दूर का राहिलो यांचा खुलासा केला होता. आपल्या बालपणी घडलेल्या एका घटनेचा उल्लेख तिनं या कॉलमध्ये केला होता.
तिनं सांगितलं, ‘जेव्हा मी लहान होते तेव्हा माझ्या आई-वडीलांचं वेळापत्रक नेहमीच बिझी असायचं. दोघंही अभिनेता असल्यानं अनेकदा ते घरी नसत. अशावेळी मी आणि माझा भाऊ त्यांना भेटायला सेटवर जात असू.”एकदिवस मी माझ्या बाबांच्या मेकअप रुममध्ये खेळत असताना माझं बोट एका ओपन सॉकेटमध्ये अडकलं. ज्यामुळे मी खूप घाबरले होते आणि त्यानंतर मी सेटवर जाणंच सोडून दिलं.’
या घटेनेच्या उल्लेखानंतर मजेदार अंदाजात श्वेतानं सांगितलं, कदाचित हे एक कारण होतं की माझ्या मनात सेटबद्दल एवढी भीती निर्माण झाली की मी या क्षेत्रापासून दूर राहणंच पसंत केलं.श्वेतानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘सुरुवातीच्या काळात मला वाटायचं की, अभिनय करणं सर्वात सोप्पं काम आहे.
पण जेव्हा शाळेत असताना मी एका नाटकात अभिनय केला होता. तेव्हा मला समजलं की हे किती कठीण आहे. एका नाटकात मी मी हवाई गर्ल झाले होते. यासाठी मी खूप मेहनत आणि सराव सुद्धा केला होता. पण तरीही अखेरच्या क्षणी मी माझे संवाद विसरून गेले आणि आमचं नाटक खराब झालं. हा माझ्यासाठी सर्वात वाईट अनुभव होता.’