‘ शका लका बुम बुम ‘ या मालिकेद्वारे हंसिका मोटवानी ही घरोघरी ओळखल्या जाऊ लागली. हंसिकाने 2001 मध्ये एकता कपूर यांची ‘ देस मैं निकला होगा चांद ‘ या मालिकेद्वारे बालकलाकार म्हणून पदार्पण केले होते. यानंतर ती चित्रपटांकडे वळाली. 9 ऑगस्ट 1991 रोजी हंसिकाचा जन्म मुंबई इथे झाला होता. चला तर मग त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी
हंसिकाचे वडील हे मोठे उद्योगपती आहेत तर आई त्वचाविज्ञानी आहे. तथापि, तिच्या आई वडिलांनी घटस्फोट घेतला होता ज्यानंतर हंसिकाला तिच्या आईनेच सांभाळले. हंसिकाने मुंबई मधील पोदार आंतरराष्ट्रीय शाळेमधून आपले शिक्षण घेतले.
हंसिकाने दूरदर्शनवरील मालिका ‘ क्योंकी सास भी कभी बहू थी ‘, ‘ सोन परी ‘, ‘ करिश्मा का करिश्मा ‘ मध्ये काम केले. अनेक दूरदर्शनवरील कार्यक्रम केल्यानंतर हंसिकाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम केले.
वयाच्या 15 व्या वर्षी तिने दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांचा तेलगू चित्रपट ‘ देसमुदूरू ‘ केला. यांनतर हंसिकाच्या फॅन्स फॉलोविंग मध्ये प्रचंड वाढ झाली होती. तिने दक्षिणेत अनेक एका पेक्षा एक हिट चित्रपट दिले.
हंसिकाने साल 2003 मध्ये आलेल्या हृतिक रोशन यांच्या ‘ कोई मिल गया ‘ या चित्रपटात काम केले होते. चित्रपटात हंसिका बालकलाकार म्हणून दिसली होती. चार वर्षांनंतर हंसिका 2007 मध्ये आलेल्या हिमेश रेशमिया यांच्या ‘ आपका सुरुर ‘ या चित्रपटात दिसली.
यामध्ये ती मुख्य अभिनेत्री होती. त्यावेळेस हंसिकाचे वय हे केवळ 16 वर्ष होते. तरी ती तिच्या वयापेक्षा जास्त मोठी दिसत होती. त्यांना बघून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाले होते.
बॉलिवूड मध्ये हंसिकाचा दुसरा चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झालेले ‘ मनी हैं तो हनी हैं ‘ हा होता. यांनतर हंसिका कोणत्याच हिंदी चित्रपटात दिसली नाही. बॉलिवूड मध्ये काही चांगले यश न मिळाल्यामुळे ती दाक्षिणात्य सिनेमांकडे वळाली. आज तिची गणना ही दाक्षिणात्य चित्रपटातील मोठ्या अभिनेत्रींमध्ये केली जाते.